वाशिम : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस होत असून सोबत गारा आणि वादळीवाराही राहत आहे. यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणखी काही दिवस असेच चित्र कायम राहणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाचे प्रादेशिक केंद्राकडून शुक्रवारी वर्तविण्यात आला.
नागपूर हवामान विभागाने दि. २८ एप्रिल रोजी दुपारी १२:१४ मिनिटांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस अवकाळीचे ढग कायम राहणार आहेत. वर्तविलेल्या अनुमानुसार २ मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी वारा होणार आहे. यात २८ आणि २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट तर , ३० एप्रिल, १ आणि २ मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात गारा आणि ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वादळी वारा राहणार आहे.
उपरोक्त कालावधीत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. आणखी काही दिवस अवकाळीचे थैमान कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून दररोज अंदाज जाहीर केला जातो. गत काही दिवसांपासून वर्तविण्यात येत असलेल्या अनुमानुसार जिल्ह्यात अवकाळीचे ढग कायम राहणार असल्याचे चित्र आहे.