मालेगाव, दि.२ - रब्बी हंगामातील पिकांसाठी जलप्रकल्पांमधून पाण्याचा बेसुमार उपसा झाल्याने जलसाठ्यात प्रचंड घट झाली आहे. मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या कुरळा प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मार्चच्या अखेरपासूनच शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याचे संकेत मिळत आहेत.तालुक्यातील तलावांमधील जलसाठ्यातील अवैध पाणी उपशामुळे कमालीची घट झाली आहे. त्यामुळे मालेगाव शहरासह तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील देवठाणा, गांगलवाडी, रेगाव, डोंगरकिन्ही, तरोडी आदी गावांमध्ये आतापासून पाणीटंचाई पेटल्यागत स्थिती उद्भवली आहे. मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पावरून सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे या तलावातील जलसाठा कमी झाला असून, तो सध्या १५ टक्के एवढा आहे. या तलावात जास्त जलसाठा उपलब्ध असतानाच पाणी उपशावर बंदी आणावयास हवी. मात्र, बेसुमार पाणी उपसा सुरू असताना वीज वितरण कंपनी व पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. बोरगाव लघू पाटबंधारे प्रकल्पामध्ये सध्या मृत जलसाठ्यापेक्षाही कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. ब्राह्मणवाडा लघुपाटबंधारे प्रकल्पामध्येही मृत जलसाठा आहे. सुदी लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये सध्या ४४.८९ टक्के जलसाठा असून, सुकांडा लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये, तर केवळ १.८५ टक्के जलसाठा आहे. सोनखास लघू पाटबंधारे प्रकल्पामध्ये सध्या ६६ टक्के जलसाठा आहे. कोल्ही लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये ८.९१ टक्के जलसाठा आहे. तालुक्यातील बहुतांश तलावात कमी जलसाठा असल्याने अल्पावधीतच पाणीप्रश्न गंभीर होणार असून, १० पेक्षा अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
बेसुमार उपसा; जलसाठ्यात घट!
By admin | Published: March 03, 2017 12:47 AM