कामरगाव - विद्युत जोडणीपूर्वीच महावितरणने एका शेतकऱ्याला १६ हजार ९२० रुपयांचे वीजबिल दिल्याचा प्रकार कामरगावात उघडकीस आला. त्यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. तर महावितरणने वीजजोडणी देण्यापूर्वी वीजबिल दिल्याने संबंधित शेतकरी चक्रावून गेला.
कामरगाव येथील शेतकरी नामदेवराव टांगले यांनी आपल्या गट नं. ४६४ मधील बोअरवर कृषी विद्युत पुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. त्यानंतर कारंजा येथील कार्यालयाच्या सांगण्यानुसार सन २०१७ मध्ये ६ हजार १०० रुपयांचा भरणाही केला. तरीही तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांना वीजजोडणी देण्यात आली नाही. याउलट वीजबिल मात्र देण्यात आले. त्यांनी आपल्या शेतात संत्रा पिकाची लागवड केली असून, महावितरणने वीजपुरवठा न केल्याने त्यांच्या संत्रा बागेतील अनेक झाडे सुकली आहेत. वीजजोडणीसाठी संबंधित शेतकऱ्याने कधी कामरगाव तर कधी कारंजा कार्यालयात येरझरा मारल्या. परंतु प्रत्येकवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांना वेगवेगळी कारणे देऊन वेळ मारून नेण्यात आली. वीजजोडणीसाठी अर्ज सादर केल्याची सत्यप्रत संबंधित कार्यालयाने दिली नसल्याचे शेतकरी महादेव टांगले यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता महावितरणने वीजजोडणीपूर्वीच वीजबिल दिल्याने नेमकी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न संबंधित शेतकऱ्याला पडला आहे.