लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर वाशिमसह जिल्ह्यातील चार शहरात गत २० दिवसांपासून सर्वेक्षण व आरोग्य तपासणी केली जात आहे. शहरी भागात मनुष्यबळ कमी असल्याने सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांची मदत घेण्यात आली आहे. परंतु सर्वेक्षण केल्यावरही आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने, नागरिकांच्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी तपासण्यासाठी पहिल्या टप्प्यात वाशिम व कारंजा शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी व सर्वेक्षण सुरू करण्यात आले. याप्रमाणेच कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या आढळून येणाऱ्या रिसोड व मंगरूळपीर शहरातही सर्वेक्षण केले जात आहे. शहरी भागात सर्वेक्षणासाठी मनुष्यबळ कमी असल्याने या मोहिमेत ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना समाविष्ठ करण्यात आले. ग्रामीण भागात सर्वेक्षण केल्यास आशा स्वयंसेविकांना जिल्हा परिषद उपकर व १४ व्या वित्त आयोगातून प्रोत्साहन भत्ता मिळतो. याउलट शहरी भागात जादा सेवा देऊनही प्रोत्साहन भत्ता मिळत नसल्याचे समोर आले आहे. ज्या शहरात सर्वेक्षण सुरू आहे, तेथील नगर पंचायत प्रशासनाने प्रोत्साहन भत्त्याची तरतूद करणे अपेक्षीत होते. परंतू, २० दिवसानंतरही अशी तरतूद केली नसल्याने आशा स्वयंसेविकांच्या संघटनेत नाराजी पसरली आहे. शहरी भागात आतापर्यंत जवळपास ३४ हजार कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात सर्वेक्षण केल्यास आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळतो. कोरोना विषाणू संसर्गाच्या कठीण परिस्थितीत आशा स्वयंसेविका प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडत आहेत. शहरी भागात सर्वेक्षण केल्यानंतर तेथेही प्रोत्साहन भत्ता मिळणे अपेक्षीत आहे.- वंदना हिवराळे,आशा स्वंसेविका
कोरोनाचे संकट पाहता आम्ही शहरी भागात सर्वेक्षणाला प्रारंभ केला आहे. स्वत:च्या कुटूंबियांची पर्वा न करता सर्वेक्षण केले जात आहे.- सुधा तिडके,आशा स्वंसेविका