संतोष वानखडे
वाशिम : युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची माहिती मिळताच, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैभव सरनाईक यांनी २ ऑगस्ट रोजी शेतकरी ग्राहक बनून रिसोड शहरातील एका कृषी सेवा केंद्रातील युरिया टंचाईचा भंडाफोड केला. स्टाॅकमध्ये युरियाच्या दोन ते तीन बॅग असतानाही युरिया नसल्याचे सांगणाऱ्या या कृषी सेवा केंद्राची चौकशी करण्याचे निर्देशही कृषी अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यात यंदा जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. सोयाबीनसह इतर पिकांना युरिया खत देण्याची घाई शेतकऱ्यांकडून केली जात आहे. एकाचवेळी मागणी वाढल्याने काही कृषी सेवा केंद्रांनी युरियाचा कृत्रिम तुटवडा भासवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून समोर येत आहेत. एका शेतकऱ्याने कृषी सभापती वैभव सरनाईक यांच्याकडे तक्रार केली असता, बुधवारी शेतकरी बनून रिसोड शहरातील एका कृषी सेवा केंद्रात युरियाच्या एका बॅगेची मागणी केली.
मात्र, युरिया नसल्याचे संबंधित कृषी सेवा केंद्र संचालकाने सांगताच, सभापतीने कृषी अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले. यावेळी साठा नोंदवहिची तपासणी केली असता, युरियाच्या दोन ते तीन बॅग आढळून आल्याने कृषी सेवा केंद्रांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्यावर शिक्कामोर्तब झाले. याप्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कृषी सेवा केंद्राच्या संपूर्ण रेकाॅर्डची तपासणी करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले.