वाशिम : परराज्यातून अथवा परजिल्ह्यातून कच्चा स्वरूपात आणले जाणारे आंबे रासायनिक प्रक्रिया करून पिकविली जात आहेत. असे आंबे सद्या जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये सर्रास विक्रीला उपलब्ध असून प्रशासकीय विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात सापडल्याचा सूर सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. केसर, दशहरी, लालबाग, बादाम आदी प्रजातींच्या आंब्याची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. संबंधित व्यावसायिकांकडून दररोज पिकलेले आंबे बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करणे कसे शक्य आहे, याबाबत चौकशी केली असता, शहराच्या बाहेर काही ठराविक ठिकाणी थाटण्यात आलेल्या ‘कोल्ड हाऊस’मध्ये कच्चा आंब्यांवर रासायनिक प्रक्रिया करून आंबे रातोरात पिकविली जातात आणि दुसºया दिवशी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली. तथापि, चुकीच्या पद्धतीने पिकविल्या जाणारे असे आंबे सेवनात आल्यामुळे विविध स्वरूपातील पोटाचे विकार जडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आंबे खरेदी करित असताना शहानिशा करूनच पुढचे पाऊल उचलावे, असा सूर सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.
आंब्याची चव झाली आंबट!पुर्वी गवतात ठेवून पारंपरिक पद्धतीने गावरान आंबे पिकविले जायचे. यंदा मात्र ग्रामीण भागात गावरान आंबा पिकलाच नाही. असे असताना इतर प्रजातीचे आंबे डाले आणि त्यात गवत ठेवून पिकविण्यात आल्याचे भासवून त्याची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार बाजारात दिसून येत आहे. असे आंबे घरी नेऊन त्याचा रस केल्यास तो चवीला अत्यंत आंबट निघत असल्याचा अनुभव काही नागरिकांनी कथन केला.