वाशिम : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्या संचारबंदी असल्याने बहुतांश नागरिक घरातच आहेत. कार्यालयीन कामेदेखील घरातूनच सुरू आहेत. दुसरीकडे उन्हाच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे घरातील पंखे, एसी, कुलर, टीव्ही, संगणक किंवा लॅपटॉप, आदी उपकरणांचा वापर वाढला आहे. पर्यायाने विजेचा वापरसुद्धा वाढणार आहे. यातील पंखे, कुलर्स, आदींचा वापर १६ ते १८ तासांवर पोहोचला असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भावामुळे संचारबंदी सुरू असल्याने वर्क फ्रॉम होम आणि उन्हाच्या झळा वाढत असल्याने प्रामुख्याने घरगुती वीज वापराचे प्रमाण वाढत आहे. या कालावधीमधील नियंत्रित बिलासाठी वीज वापराकडे लक्ष ठेवावे व मीटर रीडिंगची दररोज पाहणी करणे गरजेचे आहे. लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व पब्लिक सर्व्हिसेस वर्गवारीच्या ग्राहकांना संभाव्य वीज बिलाची पडताळणी करणे आवश्यक आहे.
००
विजेच्या दरात अशी झाली वाढ
जे ग्राहक दरमहा ८० ते ९० युनिट किंवा २८० ते २९० युनिट वीज वापर करतात, त्यांचा वीज वापर वर्क फ्रॉम होम आणि वाढत्या उन्हामुळे साधारणतः अनुक्रमे १०० किंवा ३०० युनिटपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्लॅबपुढील युनिटला दुसऱ्या स्लॅबचा दर लागणार आहे. घरगुती विजेच्या वापरासाठी १ एप्रिल २०२१ पासून नवीन वीजदर लागू झाले आहेत. वहन दर प्रती युनिट १ रुपये ३८ पैशांसह स्लॅबनुसार शून्य ते १०० युनिट ३ रुपये ४४ पैसे, १०१ ते ३०० युनिट ७ रुपये ३४ पैसे, ३०१ ते ५०० युनिट १० रुपये ३६ पैसे, ५०० युनिटपेक्षा अधिक वीज वापरासाठी ११ रुपये ८२ पैसे असे दर आहेत.
०००