लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : अयोध्या येथे ५ आॅगस्ट रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिर शिलान्यास व भूमीपूजन सोहळा पार पडत असून, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी श्रीक्षेत्र लोणी संस्थान येथून माती (मृतिका) पाठविण्यात आली आहे. दरम्यान, अयोध्या येथील राममंदिर भूमिपूजन सोहळा गावात राहून बघण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली.अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन ५ आॅगस्ट रोजी होत आहे. या सोहळ्याकरीता देशातील पवित्र नद्यांचे जल व तीर्थक्षेत्र येथील माती (मृतिका) जमा करून त्या सर्वांचे पूजन करून त्याचा वापर भूमिपूजनासाठी केला जाणार आहे. पवित्र गोदावरी नदीचे जल व माती घेऊन अयोध्या येथे भूमिपूजन समारंभास उपस्थित राहण्याकरिता जात असताना, राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव जे पद्मनाथ गिरी महाराज, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री महंत डॉ. कृष्णपुरी महाराज, पैठणचे उपाध्यक्ष राजेश जोशी यांनी श्रीक्षेत्र लोणी येथे श्री सखाराम महाराज संस्थानला रविवारी भेट दिली. संस्थानचे मठाधिपती परम पूज्य नाना महाराज यांनी लोणी येथील माती श्रीराम जन्मभूमी भूमिपूजन सोहळ्यासाठी दिली. यावेळी सखाराम महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. सखाराम जोशी, प्राचार्य कल्याण जोशी उपस्थित होते. श्री सखाराम महाराजांचा जन्म रामनववीला झाला आहे, हाही एक योगायोगच म्हणावा लागेल.(शहर प्रतिनिधी)
राम मंदिरासाठी लोणी संस्थानच्या मातीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 11:30 AM