यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्यासह तहसीलदार उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी. चेहऱ्यावर मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. बाजारपेठ, हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने, पेट्रोलपंप, लग्न अथवा इतर समारंभ, खेळाची मैदाने यासह सार्वजनिक ठिकाणी जाताना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी मास्क न लावलेल्या व्यक्ती आढळल्यास संबंधित आस्थापना मालकांवरसुद्धा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
०००००००
तालुकास्तरावर आस्थापनाधारकांची बैठक
सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तालुकास्तरावर सर्व आस्थापनाधारकांच्या संघटनांची बैठक घेऊन त्यांना कोरोना सुरक्षा विषयक नियमांचे पालन करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन या त्रिसूत्रीचे पालन होणे आवश्यक असून, याची जबाबदारी संबंधित आस्थापनाधारकांची असणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
०००००००
कोरोना बाधितांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी
कोरोना बाधितांचा लवकर शोध घेऊन त्यांना विलगीकरणात ठेवल्यास हा संसर्ग वाढणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सर्व तहसीलदारांनी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन सूक्ष्म नियोजन करावे. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तींची चाचणी होणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.