वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून, यापासून बचाव म्हणून सर्वत्र आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कोणता आहार फायदेशीर आहे आणि कोणता आहार टाळावा यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता प्रेमदास लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद....
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणता आहार घ्यावा ?कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन आहारात प्रामुख्याने प्रथिनांचा (वनस्पती प्रथीने) उपयोग आवश्यक आहे. शरिरास उर्जा प्रदान करणे, शरीर बांधणीचे कार्य करणे, शरीराची झीज भरुन काढणे, विविध आजारास प्रतिबंध करणे आदीचे कार्य प्रथिनांमधून होते. आहारामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, वरणाच्या स्वरुपात मोड आलेल्या उसळी, नास्त्यामध्ये इडली, सांबार, ढोकळा, डोसा, धिरडे, थालीपिठ, सुकामेवा, पाण्यात भिजवून बदाम अशा प्रकारे आहारात समावेश करता येईल. भोजनात सलादचा वापर करावा. सलादमध्ये कैरी, टमाटर, काकडी, बीट, मेथी याचा वापर करावा. तत्पूर्वी ते कोमट पाण्यात लिंबू पिळून धुऊन घ्यावे.
कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. यापासून सावधगिरी म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहेच; परंतु त्यासोबतच प्रत्येकाने स्वत:ची आंतरीकशक्ती व रोगप्रतिकार शक्ती वाढविणे व ती सातत्याने टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सकस आहार नियमित घेणे आवश्यक आहे.
कोणती फळे सेवन करावी आणि कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे ?क जीवनसत्व असणाºया फळांचे सेवन करावे. संत्रा, मोसंबी आदी फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. बाहेरचे खाद्यपदार्थ सेवन करणे टाळावे, फास्ट फूड, उघड्यावर शिजवलेले पदार्थ सेवन करू नये.
शरीराचे हायड्रेशन कसे संतुलित ठेवावे ?सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीराचे हायड्रेशन संतुलित ठेवणे गरजेचे आहे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे, साधारणत: ३ ते ४ लिटर तसेच दुपारच्या वेळी घरगुती शरबते, जसे निंबु, शरबत, मठठा आदींचा उपयोग करता येईल. सोबतच रसाळ फळे जसे, टरबुज, खरबुज, संत्रा, मोसंबी, द्राक्षे, आदी उपयोगात आणता येईल. या सर्व गोष्टीमुळे शरीराची पाण्याची गरज तर भागतेच सोबतच आपल्या शरीरास जीवनसत्व व खनिज पदार्थही मिळतात.