लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जवळपास दहा विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे. रिक्त पदे भरण्यासंदर्भात मध्यंतरी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य एकवटले होते. बेमुदत आंदोलनाचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे एक पद भरण्यात आले. मात्र, अद्याप अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा स्वच्छता व पाणी विभाग तसेच पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, रोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी अशी दहा पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. यासोबतच तीन पंचायत समितीला कायमस्वरुपी गटविकास अधिकारीदेखील नाहीत. रिक्त पदांचे ग्रहण कधी सुटणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
वाशिम जिल्हा परिषदेत रिक्त पदांचे ग्रहण कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 2:13 PM