वाशिम : अतिविशेष मिशन इंद्रधनुष मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील १५ गावांतील अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच लसीकरण न झालेल्या ० ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २३ एप्रिल रोजी लसीकरण करण्यात आले. लसीकरणादरम्यान आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. नांदापूरकर व डॉ.कंगुले यांनी १५ गावांना भेटी देऊन पाहणी केली.
बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. तथापि, आरोग्य विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, अर्धवट लसीकरण होणे तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. हे टाळण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल महिन्यापासून राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये ‘अति विशेष मिशन इंद्रधनुष मोहिम’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जोडगव्हाण, हनवतखेडा, डही, मंगरूळपीर तालुक्यातील जांब, मूर्तिजापूर, सनगाव, कारंजा तालूक्यातील इंझा, सोहळ, वाशिम तालुक्यातील तांदळी बु., पंचाळा, राजगाव, सावळी, रिसोड तालु्क्यातील गोहगाव, वनोजा, लिंगा कोतवाल या १५ गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे २३ एप्रिल रोजी ० ते २ वर्षे वयोगटातील वंचित बालके व गरोदर माता, राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे यापूर्वी देय असणाºया सर्व लसींची मात्रा मिळालेली नाही, अशा सर्व असंरक्षित बालके व गरोदर मातांना, अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांना लसीकरण करण्यात आले. सहसंचालक डॉ. नांदापूरकर, डॉ.कंगुले यांनी १५ गावांना भेटी देऊन पाहणी केली व मोहिमेची माहिती घेतली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर आदींची उपस्थिती होती.