लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात रविवार, १९ जानेवारीला सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत एकूण ९५० बुथवर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. शहरी भागात जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते; तर ग्रामीण भागात शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांच्या हस्ते बालकास लस पाजून लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या मोहीमेच्या यशस्वीतेसाठी २ हजार ५१७ कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सेवा दिली.जिल्हा सामान्य रुग्णालय येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. भगत यांची उपस्थिती होती. शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह मालेगाव पंचायत समितीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते.सुमारे १ लक्ष १९ हजार ४७२ बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. या मोहिमेसाठी शहरी भागातील १२४ व ग्रामीण भागातील ८२६ अशा एकूण ९५० बुथवर २ हजार ५१७ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले. वीट भट्ट्या, गिट्टी खदान, मजुरांच्या वस्त्यांमधील बालकांना लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागात २३ व शहरी भागात ८ अशा एकूण ३१ मोबाईल टीम कार्यरत होत्या. प्रवासातील बालकांना लसीकरण करण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बस थांबे, चौफुलीच्या ठिकाणी १३१ ट्रान्सिट टीम तैनात करण्यात आल्या होत्या.
वाशिम जिल्ह्यातील ९५० बुथवर झाले लसीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 2:07 PM