जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यात कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून साधारणत: १५ फेब्रुवारीपर्यंत संसर्गाची ही पहिली लाट कायम राहिली. या कालावधीत ७ हजार ४३० बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर मात्र आलेल्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांचे प्रमाण झपाट्याने वाढायला लागले. आरोग्य यंत्रणेकडे असलेला ‘स्टाफ’ही यामुळे कमी पडायला लागला. त्यामुळे प्रत्येकी तीन महिन्यांचा करार करून १०० अधिपरिचारिका, ५७ लॅब टेक्निशियन आणि ५७ डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा २१४ लोकांना सेवेत घेण्यात आले. त्यापैकी अनेकांना कोविड केअर सेंटरवर नियुक्ती देण्यात आली. गरज संपल्यानंतर अर्थात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताच संबंधित कर्मचाऱ्यांचा करारही संपुष्टात येणार, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुषंगाने १ जूनपासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने नोकरी जाणार, अशी भीती कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागून होती; मात्र कोरोना लसीकरणाला गती देण्यात आल्याने तूर्तास हे कर्मचारी या संकटातून बचावले आहेत.
...................
कंत्राटी तत्त्वावर घेतलेले कर्मचारी
१००
अधिपरिचारिका
५७
लॅब टेक्निशियन
५७
डाटा एन्ट्री ऑपरेटर
..............
रुग्ण नाहीत; पण कोविड केअर सेंटर सुरू
जिल्ह्यात कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी ९ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. १ जूनपासून कोरोना संसर्गाने बाधित होणाऱ्यांचा आलेख सातत्याने घसरला आहे. त्यामुळे बहुतांश सेंटर रिक्त झाले आहेत; मात्र संसर्गाची तिसरी लाट गृहीत धरून एकही सेंटर अद्यापपर्यंत बंद करण्यात आलेले नाही.
...............
कोट :
कोरोना काळात कंत्राटी तत्त्वावर सेवेत घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा करार वाढवून देण्यात आला आहे. कोविड केअर सेंटरसह, लसीकरण मोहीमस्थळी या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. यासह संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास पुढेही पुरेसे मनुष्यबळ लागणार असल्याने तूर्तास तरी सदर कर्मचाऱ्यांची नोकरी सुरक्षित आहे.
- डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम