लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील जवळपास ३ लाख ११ हजार बालकांना ही लस दिली जाणार आहे. या वयोगटातील कोणतेही बालक गोवर-रुबेला लसीकरणापासून वंचित राहू नये, याची काळजी पालकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.यावेळी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. पुरुषोत्तम कुमार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, कोणत्याही बालकाला या लसीकरणाचे विपरीत परिणाम होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आली आहे. यासाठी वैद्यकीय पथके सुध्दा तैनात करण्यात आली आहेत. लसीकरण मोहिमेदरम्यान विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याबाबत वीज वितरण कंपनीला कळविण्यात येणार असल्याचे सांगितले. तालुकास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत २७ नोव्हेंबर रोजी या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ३ लाख ११ हजार ५६७ बालकांना ५ आठवड्याच्या कालावधीत ही लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १३६० शाळांमधील २ लाख २४ हजार ६९२ विद्यार्थी, ११८३२ अंगणवाड्यातील ८३ हजार ९६३ लाभार्थी तर शाळाबाह्य ३५१२ लाभार्थ्यांना देखील ही लस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याची माहिती देखील जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर व डॉ. पुरुषोत्तम कुमार यांनी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
वाशिम जिल्ह्यात ३ लाख ११ हजार बालकांना देणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 3:16 PM