कारंजा लाड : कारंजा पंचायत समितीअतंर्गत येत असलेल्या शहरातील शाळांनी प्रवेश व अन्य स्वरूपातील शुल्कासाठी मोठ्या प्रमाणात लूट चालविली आहे. अशा आशयाच्या पालकांच्या तक्रारीवरून ११ फेब्रुवारी रोजी मनसे व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केली. कारंजा येथील एस.एन. चवरे विद्यालयात गौरवी भालचंद्र श्यामसुंदर, अश्विनी जाधव, गायत्री शिंदे या विद्यार्थ्यांना शुल्क न भरल्याने शाळेत बसू दिले नाही, अशी तक्रार संंबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसेकडे केली होती. मनसे तालुकाध्यक्ष अमोल लुलेकर, कपिल महाजन व प्रहार संघटनेचे महेश राऊत यांनी या प्रकाराचा जाब विचारासाठी शाळेत धडक दिली. त्यानंतर पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी उघडल्यानंतर तिथे जाऊन शिक्षणाच्या नावाखाली कारंजात सुरू असलेला प्रकार तसेच एस.एन. चवरे विद्यालयाकडून शुल्काच्या कारणावरून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रकार बंद करावा, असे म्हणत खुर्च्या व इतर साहित्याची तोडफोड केली.
तक्रारीची दखल घेत शाळेत जाऊन चौकशी केली असता, शुल्क न भरल्याने कुठल्याही विद्यार्थ्यास बाहेर काढल्याचा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. मनसे व प्रहार संघटनेकडून खुर्च्यांची व इतर साहित्यांची तोडफोड करणे योग्य नाही.- एस.एम. अघडतेगटशिक्षणाधिकारी, पं.स., कारंजा
विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आल्याची तक्रार करण्यात आली; मात्र असा प्रकार शाळेकडून आतापर्यंत झालेला नाही आणि पुढेही कधी होणार नाही. सदर शाळा शिक्षण क्षेत्रात नावाजलेली असल्याने कदाचित बदनाम करण्याचा हा प्रकार असू शकतो. - शशीकांत चवरेअध्यक्ष, शोभनाताई चवरे शाळा, कारंजा