देपूळ : वारा जहागिर सिंचन प्रकल्पाचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने उभारलेले वारा जहागिर विद्युत उपकेंद्र कागदावरच सुरू असून, प्रत्यक्षात वीजपुरवठा मात्र आसेगाव वीज उपकेंद्रातूनच सुरू आहे. मात्र ज्या डॅमसाठी हे ३३ केव्ही उपकेंद्र उभारले गेले, त्या डॅमच्या फीडरचे काम केलेच नाही तर गावठाण व एजी फीडरचे कामही अपूर्ण असून, झालेले वीजखांब व वाहिन्यांचे काम निकृष्ट असून, वादळ वाऱ्याने हे झुकत आहेत. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
वारा जहागिर डॅमचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांचे हिरवे स्वप्न प्रत्यक्षात साकार व्हावे यासाठी डिगांबर खोरणे, विलास ढगे, धनगर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव लांभाडे यांनी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक यांच्याकडे प्रश्न लावून हे उपकेंद्र मंजूर झाले व कामही झाले. परंतु अर्धवट काम झाल्यामुळे हे उपकेंद्र निरूपयोगी ठरत आहे.
- वारा जहागिर वीज उपकेंद्र सुरू झाले असून, तेथे ऑपरेटरचीही नियुक्ती केली आहे, सात-आठ दिवसात त्यावर ११ केव्हीचा लोड चढवू.
हिरालाल जांभूळकर,
उपविभागीय आभियंता, विद्युत वितरण उपविभाग, मंगरूळपीर
- वारा जहागिर वीज उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून, हे उपकेंद्र विद्युत वितरण उपविभाग, मंगरूळपीरकडे हस्तांतरित केले आहे व त्यांना सर्व फीडर जोडण्याचे सांगितले. त्याचा प्रत्यक्षात लाभ ग्राहकांना केव्हा द्यायचा हे मंगरूळपीर उपविभागावर आधारित आहे.
बी.डब्ल्यू. भिसे
कार्यकारी अभियंता, इमफ्रा, वाशीम
---