वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष बुथनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारीत २५ मतांची तफावत आहे. ही बाब गंभीर असून ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी समनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा.डॉ. अनिल राठोड यांनी ३० मे रोजी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिकेद्वारे केली आहे.
राठोड यांच्या म्हणण्यानुसार, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. ते १२ लाख २० हजार १८९ इतके असून त्याची टक्केवारी ६२.८७ इतकी असल्याचे यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला कळविले होते. मात्र, समनक जनता पार्टीने बुथनिहाय झालेल्या मतदानाच्या यादीत २५ मते अधिक असल्याचे आढळून आले. त्यात राळेगाव विधानसभा मतदार संघात २० आणि वाशिम विधानसभा मतदारसंघातील पाच अधिक मतांचा समावेश आहे.
याप्रकरणी प्रा.डॉ. राठोड यांनी २९ मे रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. जोपर्यंत मताची आकडेवारी निश्चित होत नाही तोपर्यंत मोजणी प्रक्रिया थांबवावी. तसेच फार्म १७ सी नुसार बुथनिहाय आकडेवारी जाहीर करावी, या मागणीसाठी त्यांनी वाशिम येथील विधिज्ञ ऍड.डॉ. मोहन गवई यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर ३१ मे रोजी सुनावणी होणार असून उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.