वाशिम - वाशिमकरांचे आराध्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बालासाहेब संस्थाननजिक असलेल्या देवतलावाच्या स्वच्छता व गाळ उपसण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून, ‘मी वाशिमकर ग्रुप’तर्फे देव तलाव महोत्सवाला १६ मे पासून प्रारंभ झाला. २० मे पर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहे.
वाशिमचा देवतलाव हा शहराचे वैभव असून काही वर्षांपूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या पुढाकारातून या तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला होता. दरम्यान, यावर्षी तलाव पूर्णपणे कोरडा पडला असून त्यात साचलेला गाळ हटविण्यासाठी सामाजिक संघटना व ‘मी वाशिमकर ग्रुप’तर्फे पुढाकार घेतला आहे. या मोहिमेत हजारो जल मित्रांचे हात लागले. देव तलावाच्या जलसंपन्नतेसाठी सुरू झालेल्या या मोहिमेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने देवतलाव महोत्सवाचे आयोजन केले असून, २० मे पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. १७ मे रोजी गितोत्सव कार्यक्रमात स्वर्गीय शेख वसीम उर्फ राजा बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित सेव्हन स्टार आॅर्केस्ट्रा ग्रुपच्यावतीने भावगीत व देशभक्ति गीतांचा कार्यक्रम होणार आहे. १८ मे रोजी आनंदोत्सव कार्यक्रमामध्ये राजा भैय्या ढोल पथकाद्वारे कार्यक्रम सादर केली जातील.१९ मे रोजी दिव्यांग चेतन उचितकर व चमू यांचा प्रेरणादायी कार्यक्रम होणार असून, २० मे रोजी समारोप कार्यक्रम होईल. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभागी होऊन देवतलावाच्या स्वच्छतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन ‘मी वाशिमकर ग्रुप’च्या वतीने करण्यात आले.