लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एकात्मिक बाल विकास सेवा योजना तथा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत वाशिम तालुक्यातील १७० अंगणवाडी केंद्रांत ८ ते २० मार्च दरम्यान पोषण पंधरवडा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत बालक, युवक, किशोरी आणि महिलांमध्ये पोषण आहार मार्गदर्शनासह कुपोषित बालकांची तपासणी, तसेच गरोदर माता व विद्यार्थी-पालकसभा आणि रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ८ ते २२ मार्च दरम्यान पोषण पंधरवडा राबविण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मीना, महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांचे मार्गदर्शनात वाशिम प्रकल्पातील एकूण १७० अंगणवाड्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. वाशिम तालुक्यातील अडोळी, अनसिंग, काटा, पार्डी टकमोर, तोंडगाव, उकळीपेन या बिट मधील सर्व केंद्रांमध्ये किशोरी आणि बालकांच्या आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. किशोरींना आणि महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. स्वजाणीव, कायदेशीर अधिकार, जीवन कौशल्य आणि निर्णय क्षमतेबाबत या कार्यक्रमात माहिती देण्यात आली. गावोगावी रॅली काढून जनजागृती करण्यात आली. बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, पर्यवेक्षिका अमिता गिर्हे, मीनाक्षी सुळे यांचे नियोजनात पंधरवडा साजरा केला जात आहे. २२ मार्चपर्यंत विविध कार्यक्रम घेऊन अंगणवाडी केंद्रांमध्ये पालकांना विविध विषयाची माहिती देणे व जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
वाशिम तालुक्यातील १७० अंगणवाड्यांमध्ये पोषण अभियानांतर्गत विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 3:21 PM