सुनील काकडे, वाशिम: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत युसूफ शेख यांनी फ्रान्स येथील ऑडेक्स क्लबच्या वतीने नागपूर रॅडोनियर्सव्दारा आयोजित सायकल स्पर्धेत सहभागी होऊन हैद्राबाद ते नागपूर हे हजार किलोमिटरचे अंतर अवघ्या ७० तासांत पूर्ण करण्याची किमया साध्य करून दाखविली आहे.
या मोहिमेला नागपूर येथील झिरो माईल फ्रिडम पार्क येथून सुरूवात झाली. नागपूर, बुटीबोरी, जांब, हिंगणघाट, पांढरकवडा, आदिलाबाद, निर्मल, कामारेड्डी, हैद्राबाद व परत त्याचमार्गे नागपूर असे अंतर सायकलने पूर्ण करायचे होते. हे आव्हान युसूफ शेख यांनी लिलया पेलले. नागपूर येथून जाताना तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्हयातील २५ ते ३० कि.मी.चा अवघड घाट त्यांनी पार केला. शेख यांच्यासोबत इतर सात सायकलपटू स्पर्धेत सहभागी होते.
सायकलपटू शेख यांची कामगिरी काैतुकास्पद- यापूर्वी युसूफ शेख यांनी तीनवेळा सुपर रॅडोनियर्स मोहिम पूर्ण केली आहे. वाशिम ते सावनेर-पांढुर्णा (मध्यप्रदेश) परत वाशिम हे ६०० कि.मी.चे अंतर तीनवेळा, वाशिम ते वरूड ४०० कि.मी., वाशिम ते अमरावती ३०० कि.मी., वाशिम ते देवळी (वर्धा) ४०० कि.मी., नाशिक ते शिरपूर (धुळे) ४०० कि.मी. आणि अमरावती ते सिंदखेडराजा ६०० कि.मी.चे अंतर त्यांनी सायकलने पूर्ण केले आहे.
प्रशासकीय कामातही प्रशंसनीय कार्य- युसूफ शेख यांनी उत्कृष्ट सायकलपटू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासोबतच प्रशासकीय कामकाजातही वेगळेपण दाखविले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच लेखाविषयक कामकाजात उत्कृष्ट काम केल्याप्रती विभागीय आयुक्तांकडून प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात आले, हे विशेष.