वाशिम : पत्नीच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकासाठी फिर्यादीकडून २५०० रुपयांची लाच स्विकारणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षकाला ५ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सचिन शिवाजीराव बांगर (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदाराच्या पत्नीचे वैदकीय प्रतिपूर्ती देयक पडताळून सही शिक्का घेण्याकरिता कार्यालयीन अधीक्षक सचिन बांगर याने फिर्यादीकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र, फिर्यादीला लाचेची रक्कम द्यावयाची नसल्याने त्यांनी वाशिम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने ५ जून रोजी पडताळणी कारवाई केली असता, आरोपीने तीन हजाराची मागणी करून तडजोडीअंती २५०० रुपये स्विकारण्याचे मान्य केले तसेच सापळा कारवाईदरम्यान पंचासमक्ष २५०० रुपये स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. वाशिम शहर पोलिस स्टेशनला आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वात कर्मचारी नितीन टवलारकार, विनोद मार्कंडे, योगेश खोटे यांनी पार पाडली.
तर तक्रार नोंदवा
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक गजानन शेळके यांनी केले.