कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गत वर्षभरापासून अनेकजण हतबल झाले असून बहुतांश लोकांची आर्थिक घडी पूर्णत: विस्कटलेली आहे. अशातच मालेगाव नगर पंचायतीलाही विकासकामांसाठी निधी उपलब्ध नाही. परिणामी, दैनंदिन साफसफाई, नाल्यांची स्वच्छता, पाणीपुरवठा आदी मूलभूत सुविधांचा बोजवारा उडत आहे. मालेगाव नगर पंचायतीवर गत महिन्यापासून प्रशासक राज आल्यापासून सुविधांचा प्रश्न गंभीर झाला असून आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने विकासकामांसाठी निधी अपुरा पडत आहे. दुसरीकडे आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे नागरिकही त्यांच्याकडे थकीत असलेला कर भरण्याकामी उदासीन असल्याने समस्या अधिकच बिकट झाली आहे.
शहरातील बहुतांश नागरिकांकडे मालमत्ता कर, दिवाबत्ती कर थकीत असल्याने नगर पंचायतीची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब झाल्याचे दिसून येत आहे.
....................
विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त
शहरात मूलभूत सुविधांचा गेल्या काही दिवसांपासून अभाव असून नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नगरपंचायतचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत हे महिनाभरापूर्वी केवळ पद स्वीकारण्याकरिता नगर पंचायतीमध्ये आले होते. त्यानंतर ते पुन्हा फिरकलेच नाहीत. मुख्याधिकारी डॉ.विकास खंडारे यांना काही दिवसांपूर्वी कारंजा नगर परिषदेचा प्रभार देण्यात आला. मंगरूळपीरचा अतिरिक्त प्रभारही त्यांच्याकडेच असल्याने मालेगावला सध्यातरी कोणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे.
.................
कोट :
शहरात मुलभूत सोयी-सुविधा नागरिकांकडून गोळा होणाºया कराच्या माध्यमातून पुरविण्यात येतात. असे असताना अपेक्षित प्रमाणात करवसुली झालेली नाही. नागरिकांनी सहकार्य करावे, सुविधा पुरविण्यात येतील.
डॉ. विकास खंडारे
मुख्याधिकारी, न.पं. मालेगाव