गत चार, पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शेजारच्या अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यात कोरोनाचा कहर असून, वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न म्हणून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी बुधवारी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. जिल्ह्यातील सर्व नगर पंचायत, नगरपालिकेने भाजीपाला, फळे विक्रेत्यांना विकेंद्रित स्वरूपात जागा उपलब्ध करून देऊन एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करावी तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या आठवडी बाजारांच्या दिवशी ग्रामसेवकांनी स्वत: उपस्थित राहून कोरोनाविषयक सुरक्षा नियमांचे पालन होईल, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वाशिम येथील पाटणी चौकातील भाजीबाजारासाठी विकेंद्रित स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आली. पाटणी चौकातील भाजीबाजार पूर्णत: बंद केला असून, पहिल्या दिवशी अर्थात १८ फेब्रुवारी रोजी पोलीस कर्मचारीही तैनात केल्याचे दिसून आले. नागरिकांनीदेखील एकाच ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले.
भाजीबाजार अन्यत्र हलविला; गर्दी टाळण्याचा प्रयत्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:31 AM