लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: परजिल्ह्यातून होणारी आवक घटल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून भाजीपाल्याचे दर गगणाला भिडले असून, रविवारी वाशिमच्या बाजारात, तर सोमवारी आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील बाजारात टमाटर चक्क १२० रुपये प्रतिकिलो दराने विकल्या गेले. अचानकपणे वाढलेल्या या महागाईमुळे गृहिणींचे आर्थिक बजेट बहुतांशी कोलमडल्याचे दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन तुलनेने कमी होत असल्याने नजीकच्या हिंगोली जिल्ह्यासह मेहकर, डोणगाव, अमरावती भागातून भाजीपाल्याची आवक होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यात घट झाल्याने दर वधारले आहेत. सोमवारी वाशिमच्या बाजारात टमाटर तब्बल १२० रुपये प्रतिकिलो दराने विकले गेले. यासह फुलकोबी, कारले, हिरवी मिरची, वांगी ६० रुपये किलो, तर पत्ताकोबी ४० रुपये, बटाटे २० रुपये प्रतिकिलो दराने विकले गेले. कोथिंबीरचे दरदेखील गगणाला भिडले असून, तब्बल २०० रुपये प्रतिकिलो दराने कोथिंबीर विकल्या गेली. वाशिमच्या बाजारात नजीकच्या खेड्यापाड्यांसह शहरातून मोठ्या संख्येने ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी येतात. त्या तुलनेत मात्र भाजीपाल्याची अपेक्षित आवक झाली नसल्याचे दिसून आले.
भाजीपाल्याचे दर वधारले; गृहिणींचे बजेट कोलमडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:57 AM