पोषक वातावरण आणि सिंचनाकरिता पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात गेल्या काही आठवड्यापासून वाढ झाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या हर्रासच्या वेळी पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचे दिसून आले. यामुळे दिवसभर बाजारात ग्राहकांना स्वस्त दरात पालेभाज्या मिळाल्या, तर कांदा व आलूचे दर आज स्थिर होते. लसूणमध्ये प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ होऊन १४० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली. यासह अद्रक ८० रुपये प्रतिकिलो, टमाटर १०, हिरवी मिरची ६०, दोडकी व भेंडी ४०, सिमला मिरची ६०, पत्ताकोबी २०, फुलकोबी ३०, वांगी ४०, बरबटी व आवरा शेंग ४०, मेथी व पालक २०, बीट ४० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे बाजारात विक्री झाल्याचे पाहावयास मिळाले.
.............................
खाद्यतेलाचे दर स्थिर
शेंगदाणा, सोयाबीन या खाद्यतेलाच्या दरामध्ये गत आठवड्यात वाढ झाली होती. चालू आठवड्यात मात्र हे दर स्थिर असल्याचे दिसून आले. इतरही स्वरूपातील किराणा साहित्याच्या दरामध्ये फारसा चढ-उतार झालेला नाही.
..................
फळांचे दर वाढले
गत आठवड्यात वाशिमच्या बाजारपेठेत सफरचंद ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने विकल्या गेला, तर डाळिंब, पेरूला ५० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. चालू आठवड्यात हे दर किंचितशे वाढलेले दिसले.
......................
कोट :
गेल्या काही आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर आता कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. लिंबाचे दर वाढले असले तरी त्याचा स्वयंपाकाशी फारसा संबंध येत नाही. आलू, कांद्याचे दर कमी झाल्याने ही बाब समाधानकारक ठरली आहे.
- सुनीता लाहोरे, गृहिणी
......................
चालू आठवड्यात पालेभाज्यांचे दर कमी झाल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. काही आठवड्यापूर्वी ४० रुपयावर पोहोचलेल्या टमाटरला आता १० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. यासह मेथी, पालक आणि कोथिंबिरचे दरही घसरले आहेत.
- महादेव दत्ता वानखेडे, भाजी विक्रेता
................
सफरचंद, डाळिंब, अंगूर, पपई यासह इतरही फळांच्या दरात चालू आठवड्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. यामुळे अधिक माल उपलब्ध करून देणे शक्य होत असून ग्राहकांचे प्रमाण वाढलेले आहे.
- मो. सलमान, फळ विक्रेता
..................
लसूणच्या दरात पुन्हा वाढ
कांदे आणि बटाट्याचे दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपयावर आले असताना लसूणच्या दरात मात्र वाढ झाल्याचे रविवारच्या बाजारात दिसून आले. गत आठवड्यात १२० रुपयांनी विकल्या गेलेल्या लसणाला चालू आठवड्यात मात्र १४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. अद्रकच्या दरातही वाढ झाली असून, ८० रुपये प्रतिकिलोने विक्री झाली.