लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षाच्या तुलनेत यंदा वाहन बाजारात तेजी असून, दिवाळी पाडव्यापर्यंत नवीन ३ हजाराच्या आसपास वाहने रस्त्यावर येतील, अशी शक्यता वाहन बाजारातून वर्तविण्यात येत आहे. सध्या चारचाकीसह दुचाकी वाहनाच्या काही मॉडेलसाठी वेटींग लिस्ट आहे.यंदा कोरोनामुळे एप्रिल ते जून महिन्यापर्यंत बहुतांश व्यवसाय ठप्प होते. अनलॉकच्या टप्प्यात बाजारपेठ पूर्वपदावर येत असून, अन्य व्यवसायाच्या तुलनेत वाहन बाजारात तेजी असल्याचा दावा वाहन वितरकांनी केला. कोरोना संसर्गापासून स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेऐवजी स्वत:च्या वाहनातून प्रवास करण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसून येते. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून प्रवास करण्यासाठी वाहन खरेदी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. दसºयापासून वाहन बाजाराचा गिअर टॉपवर असून, दुचाकीसह चारचाकी वाहनांची विक्री गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढली आहे. चारचाकी वाहनांच्या काही मॉडेलसाठी तर ग्राहकांना आणखी एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे वितरकांनी सांगितले. दुचाकी वाहनांच्या खरेदीत वाढ झाली असून, स्कुटरला अधिक मागणी असल्याचे दिसून येते. एक्सचेंज आॅफर, कॅश डिस्काऊंट आदी आॅफर असल्यानेही ग्राहक हे वाह खरेदीकडे वळत आहेत. दिवाळी, पाडव्यापर्यंत जिल्ह्यात नव्याने तीन हजाराच्या आसपास दुचाकीची खरेदी-विक्री होईल, असा अंदाज वाहन वितरकांनी वर्तविला.
दिवाळीपर्यंत जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या मिळून जवळपास तीन हजार दुचाकी विकल्या जातील. याशिवाय चारचाकी वाहने वेगळी. कोरोना काळात स्वत:सह कुटुंबाची सुरक्षितता, शेतमाल घरात आल्याने खेळते भांडवल आणि दिवाळी, पाडव्याचा मुहुर्त यामुळे ग्राहकांनी दुचाकी वाहनाची आगाऊ नोंदणी केली. - रौनक टावरी, दुचाकी वितरक वाशिम