वाशिम : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ५० हजारांवर शेतकऱ्यांंनी बाजार समित्यांकडे अर्ज दाखल केले. तालुका सहनिबंधकांच्या पडताळणीनंतर हे अर्ज जिल्हा उपनिबंधकांमार्फत २३ फेब्रुवारीपर्यंत शासनाकडे पाठविणे आवश्यक होते. मात्र, दीड महिना उलटूनही अद्याप या अर्जांची पडताळणीच पूर्ण झाली नसल्याची बाब उघड झाली आहे. यंदा १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबरदरम्यान बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांंना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. प्रतिशेतकरी जास्तीत जास्त २५ क्विंटल याप्रमाणे पाच हजार रुपये अनुदान या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. पणन संचालकांनी याबाबत सर्व बाजार समित्यांना परिपत्रकीय सूचना दिलेल्या आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी सोयाबीन विक्रीपट्टीसह आपला सात-बारा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांकासह सोयाबीन विक्री केलेल्या संबंधित बाजार समितीकडे अर्ज करावयाचे होते. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांंना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव संबंधित बाजार समितीने तयार केल्यानंतर तालुका सहायक निबंधकांनी प्रस्ताव तपासून जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करावयाचे होते. बाजार समित्यांमध्ये आवक होऊन विक्री झालेल्या सोयाबीनलाच अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी वाशिम जिल्ह्यातून ५३ हजार ९६१ शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज सादर केले आहेत. तालुका सहायक निबंधकांनी हे अर्ज १५ फेब्रुवारीपर्यंत पाठविणे आवश्यक असताना, अद्याप हे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. सोयाबीन अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावांची पडताळणी किचकट आहे. त्यातच मधल्या काळात मार्च एन्डिंगची कामे सुरू झाल्याने बाजार समित्यांकडूनच हे प्रस्ताव विलंबाने तालुका स्तरावर प्राप्त झाले आहेत. या अर्जात त्रुटी राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. पूर्णपणे तपासल्यानंतर तालुका सह निबंधकांकडून हे अर्ज आमच्याकडे येतील. - ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था, वाशिम
५० हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी अपूर्णच!
By admin | Published: April 04, 2017 12:58 AM