लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दिवाळीपूर्वी आणि त्यानंतर ३0 ऑक्टोबरपूर्वी बहुतांश शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याचे नियोजन तांत्रिक अडचणींमुळे फसल्यानंतर, आता शासनाकडून प्राप्त ‘ग्रीन लिस्ट’ची (मंजूर यादी) पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे. पडताळणीनंतर या ‘ग्रीन लिस्ट’मधील शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याची कार्यवाही होणार आहे. विविध कारणांमुळे विलंब होत असल्याने शेतकर्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.नानाविध कारणांमुळे शेतकर्यांवर विपरित परिस्थिती ओढवल्याने सन २0१७ च्या जून महिन्यात कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यभरातील विविध संघटना तसेच शेतकर्यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची प्रक्रिया राबविण्यात आली. ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्यांची कर्जमाफीसंदर्भात ऑनलाइन नोंदणी झाली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्यांनी अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले. पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात गावस्तरावर चावडी वाचन घेण्यात आले. चावडी वाचनातून अचूक ठरणार्या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरूस्त्या केल्यानंतर सदर यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली. शासनस्तरावरही या यादीला चाळणी लावण्यात आली. सुरुवातीला दिवाळीपूर्वी काही शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात दिवाळीच्या पूर्वदिवशी अर्थात १८ ऑक्टोबर २0१७ रोजी कर्जमाफीस पात्र शेतकर्यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३३ शेतकर्यांनाच कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान केला होता. त्यानंतर ३0 ऑक्टोबरपूर्वी किमान ५0 हजार शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याचे नियोजनही केले होते; मात्र तांत्रिक अडचणींमुळे सदर नियोजन ३0 ऑक्टोबरपूर्वी प्रत्यक्षात साकार होऊ शकले नाही. शासन स्तरावर चाळणी व पडताळणीच्या विविध टप्प्यातून गेल्यानंतर पहिल्या टप्प्यात पात्र शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाची ‘ग्रीन लिस्ट’ जिल्ह्याला प्राप्त झाली. तालुका व गावनिहाय तसेच बँकनिहाय या ‘ग्रीन लिस्ट’मधील शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी परत एकदा पडताळणी करण्याच्या वरिष्ठ स्तरावरून सूचना असल्याने, ग्रीन लिस्टमधील अर्जांची पडताळणी केली जात आहे. वारंवार होणार्या या पडताळणीमुळे शेतकर्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ‘ग्रीन लिस्ट’मधील शेतकर्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले.दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्या शेतकर्यांच्या बँक खात्यांची पडताळणी यापूर्वीच करण्यात आली. ग्रीन लिस्टमध्ये असलेल्या शेतकर्यांच्या कागदपत्रे व बँक खात्यांची पुन्हा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ‘ग्रीन लिस्ट’मध्ये नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांचा सर्वाधिक समावेश असल्याची चर्चा आहे. नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.
कर्जमाफीच्या ‘ग्रीन लिस्ट’ची पडताळणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:20 AM
आता शासनाकडून प्राप्त ‘ग्रीन लिस्ट’ची (मंजूर यादी) पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे. पडताळणीनंतर या ‘ग्रीन लिस्ट’मधील शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याची कार्यवाही होणार आहे. विविध कारणांमुळे विलंब होत असल्याने शेतकर्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना विलंबामुळे शेतकर्यांमध्ये नाराजी