लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतात अहोरात्र कष्ट करून पिकविलेल्या कांद्याला सद्या मिळत असलेले दर अत्यंत कमी आहेत. यामुळे लागवड खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी असल्याने सद्याच कांदा न विकता तो साठवून दर वाढल्यानंतर विक्रीस काढण्याचा निर्धार जामखेड येथील शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी लाकूडफाटे, तुराट्या, ताडपत्रीचा वापर करून शेतातच कांदा चाळ उभारल्याचे दिसून येत आहे.यासंदर्भात माहिती देताना शेतकरी गणेश भिमराव पोफळे यांनी सांगितले, की दरवर्षी कांद्याला चांगला दर मिळत असल्याने सर्व बारकावे आत्मसात करून शेतात कांदा लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले. माझ्यासह परिसरातील इतर कांदा उत्पादक शेतकºयांना विक्रमी उत्पादनही मिळाले; मात्र यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने तोंड वर काढल्याने गेल्या दोन महिन्यांपासून शासनस्तरावरून लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे कांदा विक्रीसाठी बाहेर जाऊ शकला नाही. यासह मालेगाव, वाशिमच्या बाजारपेठेत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. त्यामुळेच दरवाढीची प्रतीक्षा करण्याचा निर्धार करून शेतात तात्पुरत्या स्वरूपात कांदा चाळ उभी केल्याचे शेतकरी गणेश पोफळे यांनी सांगितले.कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन लागलेला आहे. यामुळे शेतमालाला तुलनेने अपेक्षित दर मिळणे अशक्य झाले आहे. त्यात कांदा उत्पादकांचेही नुकसान होत आहे. यामुळेच जामखेड येथील शेतकºयांनी तात्पुरती सोय करून कांदा चाळ उभी केली. हा निर्णय कौतुकास्पद आहे.- शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम