पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या माध्यमातून अविरतपणे पशुवैद्यकीय सेवा देणाऱ्या पदविका प्रमाणपत्रधारक पशुवैद्यकांना कृत्रिम रेतन वगळता इतर कामे करून घेणे बेकायदेशीर आहे. असे असताना इतर कामे न केल्यास किंवा कमी प्रमाणात केल्यास संबंधितांवर कार्यवाही केली जाते. हा अन्याय दूर करण्यात यावा, पदविकाधारक पशुवैद्यकांसाठी सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम पूर्ववत सुरू करावा, १२वी विज्ञान शाखेनंतर तीन वर्षांचा पदविका अभ्याससक्रम पशुविज्ञान विषयासह सुरू करण्यात यावा, कर्मचाऱ्यांना कामानिमित्त दाैरे करावे लागतात. मात्र, भत्त्याची तरतूद केली जात नसल्याने देयके प्रलंबित आहेत. हा प्रश्न तत्काळ निकाली काढावा, पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त असलेली पदे तत्काळ भरण्यात यावी, पशुधन पर्यवेक्षक ते सहायक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा करावा आदी मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या अंतर्गत १ ऑगस्टपासून बेमुदत संप, तर २ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन केले जाणार आहे.
................
जनावरांचे लसीकरण थांबले, पशुपालक त्रस्त
पशुचिकित्सा व्यावसायी संघटनेने गेल्या दीड महिन्यापासून असहकार आंदोलन सुरू केले. यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये जनावरांचे लसीकरण थांबले आहे. ऐन पावसाळ्यात उद्भवलेल्या या समस्येमुळे पशुपालक त्रस्त झाले असून, जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला असल्याने अडचणीत अधिकच भर पडली आहे.
...............
लोकप्रतिनिधींना दिले निवेदन
पशुचिकित्सा व्यावसायी संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी १ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला. खासदारांसह सर्वच आमदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, उद्भवलेल्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, अशी मागणी त्यात करण्यात आली, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भागवत महाले यांनी दिली.