शिरपूर जैन: आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने वडार समाज अनेक आवश्यक आणि मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. याची जाणीव शासनाला करून देण्यासाठी मालेगाव तालुक्यातील शिरपूरच्या वडार बांधवांनी सोमवारी आमदार अमित झनक यांना आमंत्रित करून त्यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी आमदारांनी त्यांना विविध सोयीसुविधांसाठी ५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला.
शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने वडार समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच हा समाज अद्यापही विकासापासून वंचित आहेच शिवाय या समाजाला आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध नाहित. अनेक ठिकाणी या समाजाला विवाह सोहळे पार पाडण्यासाठी स्वतंत्र असे सभागृह किंवा समाजगृह नाही, स्मशानभूमी नाही, याची जाण करून देण्यासाठी शिरपूरच्या इंदिरा नगर झोपडपट्टीतील वडार बांधवांनी कूलदेवी उत्सवासाठी मालेगाव-मेडशीचे आमदार अमित झनक यांना आमंत्रित केले आणि आपल्या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या. यावेळी आमदार अमित झनक यांनी वडार समाजाला विविध सोयीसुविधांसाठी ५ लाख रु पये आमदार निधीतून देण्याचे जाहीर केले. या प्रसंगी उपसरपंच असलम परसुवाले, सलीम गवळी, माजी सरपंच विकास चोपडे, अमित वाघमारे, गजानन क्षीरसागर, किशोर जाधव, तसेच वडार समाजातील बबन डुकरे, गणेश डुकरे, सुरेश डुकरे, विशाल डुकरे, आनंदा डुकरे, नागाराव जाधव, उमेश डुकरे, उधाना डुकरे, गजानन डुकरे, रामा डुकरे यांच्यास अनेक महिला, पुरुष मंडळी उपस्थित होती.