वाशिम : शहर व ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रुजविणे तसेच खेळांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाते. सन २०१९-२० या वर्षात ८ जिल्ह्यांसाठी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांना ७७.४१ लाखाचा निधी मंजुर केला आहे. यामध्ये विदर्भातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही.क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्र राज्य अग्रगण्य राहावे, नागरिकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, खेळाडूंना क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाच्या दर्जात सुधारणा आदींसाठी राज्यात विविध क्रीडा विषयक योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक ‘जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना’ ही योजना असून याअंतर्गत प्रशिक्षण केंद्रांना निधी पुरविला जातो. सन २०१९-२० या वर्षात या योजनेंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १० डिसेंबर रोजी राज्यातील सहा प्रशिक्षण केंद्रांना निधी मंजूर केला आहे. यामध्ये विदर्भातील एकाही प्रशिक्षण केंद्राचा समावेश नाही. नाशिक विभागातील नाशिक येथील जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राला १०.९० लाख, धुळे ९.५९ लाख, जळगाव ११.५८ लाख, नंदूरबार ५.३५ लाख, औरंगाबाद विभागातील परभणी ११.८६ लाख, लातूर विभागातील लातूर ११.३५ लाख, उस्मानाबाद ४.७४ लाख, कोल्हापूर विभागातील सांगली प्रशिक्षण केंद्रास १२.०२ लाख रुपये वितरीत करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे.
जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांतर्गतच्या निधीची विदर्भाला हुलकावणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:13 AM