- संतोष वानखडे
वाशिम, दि. - नवीन तूर बाजारात येताच, तूरीचे भाव गडगडले आहेत. शासनाने ५०५० रुपये असा हमीभाव जाहीर केलेला असतानाही, बाजार समित्यांमध्ये ४५०० ते ४७०० रुपये क्विंटलप्रमाणे तूरीची खरेदी सुरू आहे.
शेतमाल तयार झाला की बाजारभाव कोसळतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. जुलै महिन्यात तूरीला असलेले ९५०० रुपयाच्या आसपासचे बाजारभाव आता ४६०० रुपयांदरम्यान स्थिरावले आहेत. सन २०१२ ते २०१५ या वर्षात वाशिम जिल्हा हा कोरड्या दुष्काळातून गेला. या दुष्काळाच्या झळा सन २०१६ मध्ये समाधानकारक पावसाने कमी केल्या. त्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या. दुसरीकडे याच वर्षात विविध कारणांमुळे शेतमालाचे बाजारभावही गडगडले. आता तूरीचा शेतमाल तयार झाला आहे. दुसरीकडे बाजारभाव पत्त्याप्रमाणे गडगडत आहेत. शासनाने तूरीला ५०५० रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव जाहिर केला असून, नाफेडद्वारे खरेदी केंद्र सुरू केली आहेत. रिसोड, वाशिम, मंगरूळपीर, कारंजा येथे नाफेडची खरेदी केंद्र सुरू आहेत. या केंद्रावर ५०५० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे तूरीची खरेदी सुरू आहे. दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ४४०० ते ४७०० रुपयांदरम्यान तूरीची खरेदी सुरू असल्याने शेतक-यांची लूट होत आहे. मंगळवारी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत तूरीला कमीत कमी ३७५० रुपये तर जास्तीत जास्त ४६३० रुपये असा सरासरी ४३१० रुपये बाजारभाव राहिला. वाशिम येथे सरासरी ४७०० रुपये प्रती क्विंटल असा बाजारभाव होता. अन्य बाजार समित्यांमध्येही हीच स्थिती दिसून आली. दुसरीकडे नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकरी विक्रीसाठी येत असल्याचे दिसून येते. नाफेडच्या केंद्रावर ५०५० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी सुरू आहे. रिसोड येथील नाफेड केंद्रावर १०६ क्विंटल ६८ किलो तूरीची खरेदी झाली. मंगरूळपीर येथील नाफेड केंद्रावर आतापर्यंत २८०० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. धनादेशद्वारे शेतक-यांना शेतमालाची रक्कम दिली जात आहे.
दरम्यान, यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी चौकशी केली जाईल. हमीभावापेक्षा कमी दराने कुणीही तूरीची खरेदी करू नये, असा सूचना दिलेल्या आहेत, असे खाडे म्हणाले.
https://www.dailymotion.com/video/x844nt6