ऑनलाइन लोकमत/शंकर वाघ
शिरपूर ( वाशिम ), दि. 22 - दिव्यांगांच्या अंगी एक गुण जास्त असतो असे म्हटलं जातं. यावक कसलीही तक्रार न करता क्षणोक्षणी रंगीबेरंगी, आनंदी आयुष्य आम्ही हसत-खेळत जगत असतो. असा आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचा संदेशही दिव्यांग देतात. असंच काहीसं उदाहरण 58 वर्षांच्या बाबूराव यांनी समाजापुढे ठेवलंय. गेल्या 25 वर्षांपासून बाबूराव यांनी बासरी वादनाचा छंद जोपासला असून याद्वारेच ते आपला उदरनिर्वाह करत आहेत.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक छोटसे गाव पळसखेड. येथे बाबुराव गोविंदराव फड आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांना दोन मुले असून त्यांच्याकडे असलेली अल्प शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा गाडा हाकणे सुरु आहे. बाबुरावांना बासुरी वादनाचा छंद आहे. ते गावात बासरी वाजवायला लागले की, अनेक नागरिक थांबून त्यांच्या बासरीवादनाचा आनंद घेतात. ते शिरपूर येथे कधीही आले की त्यांच्या बासरीची धून ऐकण्यासाठी स्थानिकांची गर्दी जमते.
कधी कधी तर अनेक श्रोते चक्क विविध गितांची फरमाइशही करतात. विशेष म्हणजे त्यांना अनेक जुनी-नवीन गाणी अवगत आहेत. यादरम्यान, त्यांचे बासरी वादनातून पादचा-यांना एकदा तरी त्यांच्याकडे लक्ष केंद्रीत करण्यास भाग पाडते. बासरी वादन झाल्यानंतर ते पुढील प्रवास करत राहतात, कुणाकडेही पैशाची स्वतःहून मागणी करत नाहीत. कुणी दिले तर ते न पाहताच आपल्या खिशात ठेऊन देतात. अनेक धकधाकट नागरिक रोजगार नाही म्हणून घरी बसतात, पण ज्यांच्या जीवनात नियतिने घाला घातला असे दिव्यांग बाबूराव मेहनतीने कमावत आहे. सोबत आपला छंद ही जोपासत आहेत.
https://www.dailymotion.com/video/x844ujp