वाशिम : जिल्हा स्त्री रुग्णालयात असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये एक दिवसापासून एका कोरोना रुग्णाचा मृतदेह पडून असल्यासंदर्भात समाजमाध्यमात गुरुवार, २२ एप्रिल रोजी एक चित्रफीत व्हायरल झाली. दरम्यान, ही चित्रफीत चुकीची असून, असा कोणताच प्रकार कोविड हॉस्पिटलमध्ये घडला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. खासगी कोविड हॉस्पिटलप्रमाणेच कारंजा व वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय येथील सरकारी कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार केले जातात. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा असल्याने मध्यम व तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत, तर अन्य सरकारी कोविड केअर सेंटर येथे सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना व्हिटॅमिनची औषधी व गृहविलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. दरम्यान, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील कोविड हॉस्पिटलमध्ये एका बेडवर एका दिवसापासून कोरोनाबाधिताचा मृतदेह पडून असून, तो झाकून ठेवण्यात आला. यामुळे शेजारच्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, असा आशय असलेली एक चित्रफीत गुरुवारी समाजमाध्यमांत व्हायरल झाली. यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, ही चित्रफीत चुकीची असून, असा कोणताही प्रकार जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये घडला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
००००
कोट बॉक्स
जिल्हा स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये असलेल्या जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही. समाजमाध्यमांत व्हायरल झालेली चित्रफीत सत्य नसून कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग दिवसरात्र परिश्रम घेत आहे.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
०००
बॉक्स
आरोग्य विभागाकडून खंडन
वाशिम येथील स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये जिल्हा कोविड हॉस्पिटल असून याठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात एखादा रुग्ण मृत झाल्यानंतर त्याचा मृतदेह नियमानुसार पॅकिंग करून नगरपालिका प्रशासनाकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी सुपूर्द करण्यात येतो. एखाद्या रुग्णाचा रात्री मृत्यू झाल्यास हा मृतदेह पॅकिंग करून जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात येतो व सकाळी अंत्यसंस्कार करण्यासाठी सुपूर्द करण्यात येतो. या कामासाठी रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही पैशाची मागणी होत नाही. तसेच दोन दिवस मृतदेह रुग्णालयीन कक्षात राहतो हे चुकीचे आहे, असा कोणताही प्रकार जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.