वाशिम - मालेगाव तालुक्यातील मुंगळा, राजूरा, गोकसावंगी परिसरात १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजतानंतर अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा, संत्रा यासह फळबागांना जबर फटका बसला आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला असून रविवारी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. वाशिम, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या चार तालुक्यांमध्ये पाऊस; तर मालेगाव आणि रिसोड या दोन तालुक्यातील अनेक गावांमध्ये निंबूच्या; तर काही गावांमध्ये त्याहीपेक्षा मोठ्या आकाराची गारपीट झाली होती. सोमवारी सायंकाळी कारंजा तालुक्यातील काही भागात गारपीट झाली. १३ फेब्रुवारी रोजी मालेगाव शहरासह तालुक्यातील मुंगळा, गोकसावंगी व राजूरा परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा या रब्बीमधील पिकांसह भाजीपाला आणि संत्रा, निंबू या फळवर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले. गारपिटीमुळे आंब्याचा मोहोरही मोठ्या प्रमाणात झडल्याचे वृत्त आहे.रविवारी मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे सुमारे १२५ एकरवरील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. धारपिंप्री, कोळगाव बु., कोळगाव खु., चांडस, तरोडी, खरोडी, सावळद आदी गावांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक होते. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू असतानाच, मंगळवारी अवकाळी पाऊस व गारपिटीने पुन्हा एकदा शेतक-यांना गारद केले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट सुरू होताच शेतकºयांची एकच धांदल उडाली. मालेगाव शहरातील अवकाळी पाऊस झाला.