- नंदकिशोर नारे / ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.12 - रोजगार नाही याची ओरड करुन अनेक जण रोजगाराचा शोध घेतांना आपल्याला दिसून येतात. मात्र अंगी गुण असल्यास कलेतूनही रोजगार मिळू शकतो याचा प्रत्यय विजय नामक युवकाने दाखवून दिला आहे.
मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील जगंदबा मातेची यात्रा जिल्हयासह मराठवाडयामध्ये प्रसिध्द आहे. या यात्रेत हजारो भाविकांची उपस्थिती असते. १२ आॅक्टोबर रोजी विजय नरवाडे नामक युवक एका कोप-यात बसून लोकर (उलन) पासून नावे तयार करतांना दिसून आला. त्याच्या आजुबाजुला असलेली गर्दी पाहून प्रत्येकाचे लक्ष त्याच्याकडे वेधल्या जात होते. तेथे जावून पाहले असता केवळ २० रुपयांमध्ये लोकरच्या दो-यापासून विविधारंगी नावे काढून देतांना आढळून आला. याबाबत विजय याच्याशी चर्चा केली असता, लहानपणचा छंद आज माझे रोजगाराचे साधन झाले आहे. प्रत्येक जिल्हयातील मोठया यात्रेमध्ये मी जावून युवकांचे नाव, विविध राजकीय पक्षांचे चिन्ह यासह नागरिकांनी सांगितलेले चित्र दो-याच्या सहायाने काढून देतो. अनेक युवक आपल्या नावाचे ब्रासलेट माझयाकडून तयार करुन घेतात. दररोज ८०० ते १००० रुपयांचा व्यवसाय होत असून यामधून माझे कुटूंब चालत असल्याचे त्याने सांगितले. विजय हा मुळचा नांदेड जिल्हयातील हदगाव येथील रहिवासी असून सद्यस्थितीत वाशिम जिल्हयातील रिसोड शहरात वास्तव्यास आहे. कोणत्याही जिल्हयात यात्रा असल्यास तो तेथे जावून गर्दीच्या ठिकाणी बसतो, त्यानंतर मात्र त्याच्याजवळच गर्दी होत असल्याचे चित्र नागरतास येथे दिसून आले.