वाशिम - केंद्रीय मंत्री राज्यात दौरे करत आहेत. नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या दोन पुत्रांना आम्ही काहीच किंमत देत नाही. त्यांना शिवसेनाही किंमत देत नाही. केंद्राने त्यांना सुरक्षा ही राज्यात फिरुन शिवसेनेवर बोलण्यासाठी दिली आहे. मात्र त्याची किंमत म्हणजे मायनस शून्य असून त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
"दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे भोळे होते म्हणून नव्हे तर कर्तृत्ववान होते. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केले, राज्य आणले. त्यामुळे उगाच त्यांच्या गुणांचे मूल्यमापन करण्याच्या प्रयत्न करू नका," अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी टीका केली. यानंतर आता शंभूराज देसाई यांनी राणेंना खोचक टोला लगावला आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाच्या तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचे मंत्री राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. "उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेण्याचे काम केले आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र १३ व्या क्रमांकावर घसरला आहे. मंत्रालयात न येता सत्तेची पाच वर्षे कशी पूर्ण करणार, असा सवाल करताना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला यांचा काहीच फायदा नाही," असेही राणे म्हणाले.
बाळासाहेब भोळे होते म्हणून त्यांचा गैरफायदा घेतला गेल्याचे विधान मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले होते. यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले की, "बाळासाहेबांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करू नका. ते कर्तृत्ववान होते म्हणून त्यांनी वर्चस्व निर्माण केले. कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस या दोन शब्दांवर त्यांनी आपले राजकारण पुढे नेले." "त्यांच्यात माणुसकी होती. जे साहेबांनी कमावले, ते काहींना टिकवता आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर बोलूच नका. तो नैतिक अधिकार तुम्हाला नाही," अशी टीका राणे यांनी केली.