Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 04:24 PM2019-09-20T16:24:03+5:302019-09-20T16:24:12+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

Vidhan Sabha 2019: Opposition eye on Congress' bastion Risod | Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर

Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर

googlenewsNext

- संतोष वानखडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहिर होण्यापूर्वीच रिसोड विधानसभा मतदारसंघात वातावरण तापत असून, काँग्रेसचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
पूर्वाश्रमीचा मेडशी विधानसभा मतदारसंघ आणि २००९ मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात १९९९ आणि २००४ चा अपवाद वगळता उर्वरीत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने राजकीय समिकरणेही बदलली आहेत. काँग्रेससह भाजपामध्येही गटबाजी असल्याने या गटबाजीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न शिवसेना, शिवसंग्राम या पक्षाकडून होत असल्याचे दिसून येते.
शिवसेना, भाजपा या पक्षाची युती होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मुंबईवारी सुरू ठेवली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून विद्यमान आमदारांचे तिकट निश्चित मानले जात असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंतराव देशमुख कोणती भूमिका घेतात, यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. अनंतराव देशमुख यांनी पूत्र नकुल यांच्यासाठी समर्थकांचा मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी केली होती. त्यांनी आपला निर्णय राखून ठेवल्याने काँग्रेसच्या गोटात तुर्तास तरी अस्वस्थता असल्याचे दिसून येते. दुसरीकडे अंतर्गत गटबाजीवर तोंडसुख घेत भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडी जवळ केली आहे. सोबतच राकॉचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी देखील वंचित आघाडीची वाट धरल्याने चुरस निर्माण झाली.
सेना, भाजपा व शिवसंग्राम या तिनही पक्षाच्या इच्छूकांनी रिसोड मतदारसंघावर दावा ठोकल्याने तिढा वाढला आहे. सेना, भाजपा युती संदर्भात वरिष्ठ स्तरावर ठोस भूमिका नसल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छूकांनी मोचेर्बांधणीला वेग दिला आहे. त्यातच शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दोन वेळा भेटी देऊन रिसोड मतदारसंघातील राजकीय वातावरण तापविले आहे. युतीत हा मतदारसंघ कुणाला सुटतो आणि उमेदवार कोण राहिल यावर लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे.
एकंदरित काँग्रेसचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी कंबर कसल्याने आणि त्यात वंचित आघाडीने वातावरण निर्मिती केल्याने काँग्रेससमोर तगडे आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसनेदेखील परंपरागत मतदार टिकवून ठेवण्याबरोबरच अन्य मतदारांना पक्षाशी जोडण्याचे प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. विरोधकांनी निर्माण केलेल्या या आव्हानांवर मात करण्यासाठी कॉंग्रेसला मतदारांची कितपत साथ मिळते, यावर काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

Web Title: Vidhan Sabha 2019: Opposition eye on Congress' bastion Risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.