- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच, इच्छूकांनी दंड थोपटत आपलीच उमेदवारी प्रबळ असल्याचा दावा केला आहे. एकापेक्षा एक वरचढ दावेदार असल्याने आणि सेना-भाजपा किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी, युतीची घोषणा झाली नसल्याने तुर्तास तरी प्रत्येकाने स्वतंत्रपणे मोर्चेबांधणीला वेग दिल्याचे दिसून येते. ऐनवेळी युती, आघाडी झाली तर इच्छूकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या तिनही मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या इच्छुकांनी संपर्क मोहिमा सुरू केल्याचे दिसून येते. गत विधानसभा निवडणुकीत रिसोड मतदारसंघ हा काँग्रेसकडे तर वाशिम व कारंजा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा विजय साकारला होता.गतवेळेप्रमाणे यावेळीही प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार की युती, आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढली जाणार हे अद्याप अस्पष्ट आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वरिष्ठ स्तरावर युतीचे संकेत असून दुसरीकडे भाजपा-शिवसेना युतीबाबत दोन्ही पक्षात साशंकता असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग देत गॉड फादरच्या भेटीसाठी मुंबई, दिल्ली वारी सुरू केली आहे.ऐनवेळी युती झाली तर कारंजा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे. पक्षाची उमेदवारी मिळाली तर ठीक; अन्यथा स्वबळावर एकदा नशीब अजमावायचे, असा निर्धार कारंजा मतदारसंघात इच्छूकांनी केल्याची चर्चा केला. युतीत कारंजा मतदारसंघ भाजपाकडे गेला तर शिवसेनेचे इच्छूक प्रकाश डहाके नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर येथे बंडखोरीचे चित्र अवलंबून राहील तर दुसरीकडे शिवसेनेकडे हा मतदारसंघ गेला तर आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुनर्वसन कसे करायचे हा प्रश्न भाजपापुढे राहील.रिसोड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमित झनक यांना उमेदवारी मिळाली तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख हे पूत्र नकुलसाठी कोणती भूमिका घेतात यावर या मतदारसंघातील चित्र अवलंबून राहणार आहे. रिसोड मतदारसंघ हा भाजपाकडे गेला तर शिवसेना व शिवसंग्रामच्या इच्छूकंकडून बंडखोरी होणार नाही, याची दक्षता घेताना भाजपाच्या दिग्गजांची दमछाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सेना, भाजपाकडे ताकदीचे उमेदवार; थांबवायचे कुणाला ?गेल्या पाच वर्षात शिवसेना व भाजपने तिनही मतदार संघात तगड्या उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना तयारी करण्याचे आदेश दिले होते; त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना व भाजपकडे ताकदीचे उमेदवार आहेत. आता युती झाली तर थांबवायचे कुणाला, असा पेच आहे. ‘बंडोबां’चे बंड थंड करण्याचे आव्हान शिवसेना-भाजपाच्या पक्षनेतृत्वासमोर राहणार आहे.
‘वंचित’कडून चाचपणीकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची शक्यता तुर्तास तरी धुसर असल्याने जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात उमेदवार उभे करून तिसरा पर्याय देण्याची तयारी वंचितकडून चालविली जात आहे. सेना, भाजपा तसेच काँग्रेस, राकाँची युती, आघाडीची घडी विस्कटली तर रिसोड व कारंजा मतदारसंघात एखाद्या बंडखोराच्या गळ्यात वंचितची उमेदवारी पडू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.