कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील गजानन चव्हाण आणि त्यांची पत्नी मंगरुळपीर आगारात लाठी येथे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत होते. त्यावेळी त्यांचा मुलगा वीर गजानन चव्हाण (०३) हा फलाटावर खेळत खेळत कारंजा आगाराच्या एमएच-०६ एक्यू-९४२० क्रमांकाच्या वाशिमकडे जाणाऱ्या बसमध्ये चढला. तो बसमध्ये सर्वात मागच्या आसनावर बसला. ही बाब त्याच्या मातापित्याच्या लक्षात येण्यापूर्वीच बस वाशिमकडे रवाना झाली. बसमधील वाहक गायत्री डोंगरे आणि चालक एस. एम. खानबरड यांनाही बसमध्ये मुलगा चढल्याचे दिसले नव्हते. बस धावू लागल्यानंतर वीरला त्याचे आईवडील दिसले नाही. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. बस धानोरा खु. येथे थांबल्यानंतर तो रडत रडत खाली उतरू लागला. त्यावेळी गायत्री डोंगरे यांच्या मनात शंका आली. त्यांनी वीरबाबत प्रवाशांकडे चौकशी केली. त्यावेळी खाली उतरणाऱ्या आणि बसमधील प्रवाशांनीही तो आपल्यासोबत नसल्याचे सांगितले. गायत्री यांनी विचारपूस केल्यावर त्याने आपले नाव वीर असल्याचे सांगितले. त्यामुळे गायत्री चव्हाण यांनी त्याला सोबतच ठेवले. पोलिसांना याची कल्पना देण्याचा त्यांचा विचार होता. दरम्यान, मुलगा न दिसल्याने वीरचे मातापिता घाबरले आणि त्यांनी चौकशी कक्षात धाव घेत माहिती दिली. काही वेळानेच गायत्री चव्हाण यांनाही ही माहिती मिळाली आणि त्यांनी मंगरुळपीर बसस्थानकावर वीरला पुन्हा त्याच्या मातापित्याच्या हवाली केले.
--------------------
मंगरुळपीर आगाराच्या कर्मचाऱ्यांनी केले सहकार्य
काजळेश्वर येथील गजानन चव्हाण यांनी त्यांचा तीन वर्षीय मुलगा हरविल्याची माहिती मंगरुळपीर बसस्थानकातील नियंत्रण कक्षात देताच आगारातील कर्मचारी गोपाल झळके यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तासाभराच्या कालावधीत बसस्थानकातून गेलेल्या सर्व बसचालक आणि वाहकांकडे चौकशी करून वीरला शोधण्यासाठी महत्त्वाचे सहकार्य केले.