सरपंचपदाचे आरक्षण शासनाने रद्द करून निवडणुकीनंतर ते काढण्याचे ठरविल्याने निवडणुकीची तयारी करणाऱ्या गाव पुढाऱ्यांची पंचाईत झाली आहे. परिणामी, पॅनल टू पॅनल निवडणूक लढविण्यावर अधिक भर दिला जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नेतेमंडळींनी कंबर कसली असून संपूर्ण पॅनल विजयी करण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करीत आहेत. यंदाच्या निवडणुकीत तरुण व नवीन चेहरे उतरले आहेत. धामणी, मानोरा, कारखेडा, गव्हा, इंझोरी, विठोली आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्ष्यवेधी ठरणार असून सर्वांचे लक्ष लागले आहे.
....................
थकीत कराचा भरणा; महसुलात भर
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांना त्यांच्याकडे असलेल्या थकीत कराचा भरणा करणे बंधनकारक आहे. त्यानुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये काही दिवसांपूर्वी झुंबड उडाली होती. यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींच्या तिजोरीत चांगलीच भर पडली आहे. अनेक दिवसांपासून थकीत असलेला कर यामाध्यमातून गोळा होणे शक्य झाले आहे.