लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ ठरली असली तरी, भाजपानेही मुसंडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचे सरपंच पद राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या, तर १३ ठिकाणी भाजप सर्मथक उमेदवारांनी बाजी मारली. तालुक्यात झालेल्या ३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत दाभडीचे सरपंच पद अविरोध झाली, तर वसंतवाडी आणि रामगड येथील सरपंच पद रिक्त आहे. त्यामुळे ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी मतदान झाले. यामध्ये पूर्वीच अविरोध झालेल्या ग्रामपंचायत सरपंचासह २१ ठिकाणी राष्ट्रवादी सर्मथित सरपंच निवडून आल्याचा तर उर्वरीत १३ ठिकाणी भाजपा सर्मथक सरपंच निवडून आल्याचा दावा त्या पक्षाच्या पदाधिकार्यांनी केला आहे. शिवसेना, काँग्रेस या पक्षांना या निवडणुक ीत अपेक्षित मजलसुद्धा गाठता आली नाही. एकूणच ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी चांगलीच मजल मारली आहे. मंगरुळपीर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा तालुक्यात विशेष करून ग्रामीण भागात चांगला राजकीय दबदबा आहे. अशात भाजपाचे यश उल्लेखनीय आहे. सरपंच पदासाठी निवडणूक लढविलेल्या भाजपाच्या सर्मथक उमेदवारांनी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश लुंगे, लक्ष्मीकांत महाकाळ, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, तालुकाध्यक्ष चंद्रमणी इंगोले, शाम खोडे, बंडू आव्हाडे यांच्या नेतृत्वात पारवा, धोत्रा, मोझरी, पिंप्री, पिंपळखुटा, बेलखेड, गिंभा, आसेगाव, भडकुंभा, शेलगाव, जांब, सोनखास, ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा झेंडा रोवला. त्याशिवाय पोघात, घोटा या ग्रामपंचायतींमध्ये इतर पक्षाच्या सर्मथकांशी हातमिळवणी करून विजय मिळविला. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच भाजपाला हे घवघवीत यश मिळविणे शक्य झाले आहे.
काही ठिकाणी जुन्याच सरपंचाचे वर्चस्व कायमतालुक्यातील शिवणी रोड, पारवा ,वरुड या ठिकाणी सरपंच पद जुन्याच सरपंचाकडे आले आहे. शिवणी व पारवा येथील पत्नीच्या जागी आता पतीराजाकडे सरपंच पदाची सूत्रे आली आहेत. तर वरुडचे सरपंच उमेश आत्माराम गावंडे यांना थेट जनतेनेसुद्धा सरपंच पद पुन्हा सोपविले आहे तर तालुक्यातील बर्याच ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटाला पुन्हा संधी मिळाली आहे. तर काही ठिकाणी प्रस्थापितांचा विरोध मोडीत काढत जनतेने नव्या चेहर्यांनासुद्धा संधी दिली आहे. ३५ पैकी दाभडी वगळता इतर ग्रा.पं. मध्ये मतदान घेण्यात आले. सरपंचांनी अविरोध निवड करुन दाभडीच्या ग्रामस्थांनी सामाजिक सलोख्याचा चांगला पायंडा पाडल्याची चर्चा ऐकावयास मिळाली