लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ६० ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत स्थानिक आयटीआय अंतर्गत वीजतंत्री पात्रताधारक उमेदवारांच्या नावाची शिफारस घेऊन ही नेमणूक करावी. याबाबत जिल्हा प्रशासन व महावितरणने विशेष प्रयत्न करून नेमणुकांच्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात १८ मे रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया, अनिल डोये, राकेश जनबंधू यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भागातील वीज समस्या दूर करण्यासाठी स्थानिक व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमणुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने नावाची शिफारस केल्यानंतर संबंधित उमेदवाराला महावितरणकडून तीन महिन्यांचे विद्युत हाताळणी, दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्याची ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली जाईल, असे ना. बावनकुळे यांनी सांगितले. कृषी पंपांना वीज जोडणी हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रथम प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी पंपांना वीज जोडण्या देण्याच्या कामाची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. याकरिता महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करून कृषी पंप वीज जोडणीच्या कामांची माहिती सादर करावी. आगामी काळात नवीन वीज जोडणी देताना ऊर्जा बचत करणारे वीज पंप घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करावे. जिल्हा वार्षिक योजनेतून महावितरण यंत्रणा सुधारण्यासाठी निधी प्राप्त करून घेण्याच्या सूचनाही ऊजामंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
६० ग्रा.पं.मध्ये ग्राम विद्युत व्यवस्थापक!
By admin | Published: May 20, 2017 1:41 AM