ग्राम स्वच्छता निगरानी समितीला मिळणार टुलकिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 2:40 PM
Washim News : गुड मॉर्निंग मोहिमेसाठी होणार टुलकिटचा वापर.
वाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) अंतर्गत जिल्हयातील ग्रामपंचायतीत स्थापन करण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता निगरानी समितीला लवकरच टुलकिट मिळणार आहेत. दोन समितीला प्रातिनिधिक स्वरुपात टुलकिटचे वितरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते २९ जून रोजी करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात वाशिम तालुक्यातील काटा आणि तामसी या ग्राम पंचायतचे सरपंच आणि सचिव यांना बोलवुन स्वच्छता टुलकिटचे वितरण करण्यात आले. तामसी ग्रामपंचायतच्या सरपंच ग्राम निगरानी समितीच्या अध्यक्षा ज्योती अर्जुन कव्हर, ग्राम विकास अधिकारी श्याम बरेटीया, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर कव्हर, प्रल्हाद कव्हर आणि काटा ग्रामपचायतचे सरपंच जया रामकिसन मोरे, उपसरपंच अनिता चक्रधर कंकणे, ग्राम विकास अधिकारी दशरथ राठोड, समिती सदस्य संजय रणखांब यांना टुल किटचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे, सहायक प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांची उपस्थिती होती.गावातील स्वच्छता शाश्वत रहावी आणि उघडयावरील हागणदारीला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने जिल्हयातील सर्व गावांमध्ये ग्राम स्वच्छता निगरानी समितीचे गठण करण्यात आले. गावातील सरपंचांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार, आशा, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक/ स्वच्छाग्रही, उमेद अभियाच्या सीआरपी महिला आणि गावाचे ग्रामसेवक अशा १० लोकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ५० पैकी प्रातिनिधिक स्वरुपात वाशिम तालुक्यातील २ ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते टुल किटचे वितरण करण्यात आले आहे. टुलकिट मध्ये ओळख पत्र, टी-शर्ट, टोपी, ॲप्रॉण, हॅण्ड सॅनिटायझर, मास्क, बॅटरी, शिटी, कापडी पिशवी ई. बाबींचा समावेश आहे. उर्वरित ४८ ग्रामपंचायतींना पंचायत समिती स्तरावरुन टुल किटचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांनी दिली.टुलकिटचा वापर गुड मॉर्निंग मोहिमेसाठी करावा: पंतवाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने जागर स्वच्छतेचा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्थापन झालेल्या ग्राम स्वच्छता निगरानी समितीने गावाच्या संपुर्ण स्वच्छतेचा विडा उचलावा असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी व्यक्त केले. निगरानी समितीच्या सदस्यांशी संवाद साधत पंत यांनी गावाच्या स्वच्छतेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. उघडयावरील हगणदारीला प्रतिबंध घालण्यासाठी व लोकांना शौचालय वापराची सवय लावण्यासाठी गुड मॉर्निंग मोहिम हे प्रभावी साधन आहे. गुड मॉर्निंग मोहिम राबविण्यासाठी निगरानी समितीला टुल किट देण्यात येत आहे. सुरुवातील जिल्हयातील ५० ग्रामपंचायतीमध्ये ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यानंतर टप्प्या टप्प्याने इतर सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही मोहिम राबवुन जिल्हयात ओडीएफ प्लस हे अभियान गतिमान करण्यात येणार असल्याचे मत वसुमना पंत यांनी व्यक्त केले.