वाकद - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत बाळखेड येथे ग्राम सुरक्षा दलाची स्थापना झाली असून, या दलाने गावाच्या सुरक्षिततेची जबाबदारी उचलली आहे.ग्रामसुरक्षा दलाची स्थापना झाल्यानंतर बुधवारी बाळखेड येथे एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच मालता दिनकर इंगोले तर प्रमुख पाहुणे म्हणून रिसोडचे ठाणेदार राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रत्नपारखी, पोलीस पाटील प्रकाश पाटील पऱ्हाड, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष केशव ढोले होते. गावात सामाजिक एकोपा कायम राहावा, भांडण, तंटे निर्माण होऊ नयेत, अपवादात्मक परिस्थितीत वाद निर्माण झाला तर आपापसातील भांडण, तंटे सामोपचारातून निकाली काढणे, गावातून गैरप्रकारांना हद्दपार करणे, आदी कर्तव्य व जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात आले आहे. या दलात एकूण ५० युवकांचा समावेश आहे. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सदस्य, गावकरी, युवकांची बहुसंख्येने उपस्थिती होती. संचालन ग्राम पंचायत सदस्य धनंजय अवताडे यांनी केले.
ग्राम सुरक्षा दलाने उचलली गावाच्या सुरक्षिततेची जबाबदारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:55 PM