लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून गावस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी गत आठवड्यापासून सुरू केली आहे. आतापर्यंत २५० पेक्षा अधिक गावांत ग्राम सुरक्षा दल स्थापन केले असून, गावात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून या दलाचे सदस्य तैनात केले आहेत. संपूर्ण चौकशी केल्याशिवाय बाहेरच्या गावातील नागरिकांना गावात प्रवेश दिला जात नाही.कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असून, एप्रिल महिन्यापर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये व बाहेरच्या जिल्ह्यातील नागरिक वाशिम जिल्ह्यात येऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात आहे. प्रत्येक गावात प्रशासनाच्यावतीने आवश्यक ते मनुष्यबळ पुरविणे शक्य होत नाही. या पृष्ठभूमीवर ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विनाकारण मोटारसायकलवर गावात चकरा मारू नये यावर ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य व पदाधिकारी वॉच ठेवत आहेत. आतापर्यंत जवळपास २५० पेक्षा अधिक गावांत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना झाली असून, प्रत्येक वार्डात दोन ते तीन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. सुरक्षा रक्षक गावात कोरोनाविषयी जनजागृती करत करीत असून, अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर निघू नका, असा संदेश गावकऱ्यांना देत आहेत. बाहेर गावावरुन येणाºया नागरिकांना अडवून सर्वप्रथम इत्यंभूत चौकशी केली जाते. त्यानंतर अत्यावश्यकता असेल तरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात बाहेरगावच्या नागरिकांना प्रवेश दिला जातो अन्यथा प्रवेश नाकारला जातो.
गावकºयांनो, कोरोना विषाणूचे गांभीर्य ओळखा !कोरोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हादरून गेले असून, केंद्र व राज्य सरकारच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनावर सोपविली असून, नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कठोर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाईदेखील केली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनीदेखील कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून गर्दी करू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, संचारबंदीच्या काळात संयम बाळगावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले.
कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन, शासन व जिल्हा प्रशासनाने आखलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी पोलीस प्रशासनातर्फे केली जात आहे. ग्रामीण भागातही प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या कामी ग्राम सुरक्षा दलाचे सहकार्य घेतले जात असून, नागरिकांनीदेखील कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून विनाकारण घराबाहेर पडू नये.
- डॉ. पवन बनसोडसहायक पोलीस अधीक्षक