महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार
वाशिम : थोर समाजसुधारक, स्री शिक्षणाच्या जनक, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त माळी कर्मचारी सेवा मंडळ, माळी युवा मंच, अखिल भारतीय माळी महासंघ व सावित्री महिला मंचने महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
..................
राज्यस्तरीय मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा
वाशिम : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने औरंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यात वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यात समाजबांधवांना भेडसावत असलेल्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती संदीप चिखलकर, विशाल कोकाटे यांनी दिली. (फोटो - २३)
...................
अनुभव कथन कार्यक्रम ६ जानेवारीला
वाशिम : येथील कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण शाखेच्या वतीने ६ जानेवारी रोजी झूम अॅपव्दारे अनुभव कथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिंतूर येथील भुईमूग उत्पादक शेतकरी मधुकर घुगे यांची मुलाखत घेतली जाणार असल्याचे कीटक शास्रज्ञ राजेश डवरे यांनी कळविले आहे.
......................
आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध आजारांमधील रुग्णांच्या गर्दीने रुग्णालय गजबजून गेल्याचे पहावयास मिळाले.
.....................
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक
वाशिम : ‘शिव जलाभिषेक’ उपक्रमांतर्गत वर्षभरातील ३६५ दिवस शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक केला जाणार आहे. त्यानुसार, ४ जानेवारी रोजी शेखर धाडवे यांनी जलाभिषेक केला. यावेळी संतोष व्यास, स्वप्निलराजे विटोकार, नाना देशमुख, महेश धोंगडे आदींची उपस्थिती होती.
................
पाइपलाइन दुरुस्त; पाणीपुरवठा सुरळीत
वाशिम : नगर परिषदेने संभाजीनगर परिसरातील फुटलेली पाइपलाइन दुरुस्त केली असून, गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.
................
ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रश्न रखडला
वाशिम : शहरातून संकलित केल्या जाणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाणार आहे; मात्र हा प्रश्न रखडला असून, तो मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे सोमवारी निवेदनाव्दारे केली आहे.
.................
वातावरणातील गारवा झाला कमी
वाशिम : गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणातील वाढत्या गारव्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दोन दिवसांपासून मात्र ढगाळ वातावरण कायम असून, गारवा कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी वाशिमचे कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
...................
अडचण ठरणाऱ्या फांद्यांची कटाई
वाशिम : वीजपुरवठा करणाऱ्या तारांना अडचण ठरत असलेल्या झाडांच्या फांद्यांची कटाई केली जात आहे. वृक्षसंवर्धाचे महत्त्व लक्षात घेऊन झाडे न तोडता केवळ फांद्याच कापल्या जात असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी सांगितले.
....................
मधुमक्षिका पेट्या परत घेण्याची कार्यवाही
वाशिम : लॉकडाऊनपूर्वी कृषी विभागाच्या वतीने मागासवर्गीय समाजघटकातील १३ महिलांना मधुमक्षिका पालनासाठी पेट्या दिल्या होत्या; मात्र योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने उद्देश साध्य झाला नाही. त्यामुळे पेट्या परत घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.