किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा पांदन रस्ता मोकळा करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकदा मागणी करूनही त्याची दखल न घेतल्याने आता ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करून हा रस्ता नियमानुसार वहिवाटीसाठी मोकळा न केल्यास सरपंचांसह ३०० ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.
मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया रामराववाडी आणि पिंपळशेंडा या दोन गावांना जोडणारा व नदीच्या पात्रातून जाणारा जुना पांदन रस्ता आहे. मालेगावच्या तत्कालीन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या कार्यकाळात २०१५ मध्ये या रस्त्याचे काम नियमानुसार सुरू करण्यात आले होते; परंतु शेतामधील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकºयांनी या पांदन रस्त्याच्या कामावर काही काळासाठी स्थगिती मिळविली होती. तेव्हपासून या रस्त्याचे काम अर्धवट असून, यामुळे रामराववाडी व पिंपळशेंडा गावातील ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे; परंतु तो बंद पडल्याने येथील पिंपळशेंडा येथील ग्रामस्थांना तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी चौफुला किंवा जोगलदरीमार्गे जावे लागते. पांदन रस्त्याची स्थिती वाईट असल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणेच काय, तर पायी चालणेही कठीण आहे. त्यामुळे या गावातील जनतेला अमानवाडीचा बाजार किंवा आजारी रुग्णांना उपचारासाठी नेणे कठीण झाले आहे. याच मार्गाने धामणगाव येथे पायदळ दिंड्या जातात. त्यात नवेगाव, चोंढी, मेडशी, चारमोळी, पाचरण, काळा कामकामठा, उमरवाडी, मेडशी, ब्राम्हणवाडा, मारसूळसह १५ ते २० गावातील वारकरी सहभागी होतात. या सर्व वारकºयांना अतोनात अडचणींचा सामना करीत मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे या संदर्भात पिंपळशेंडा आणि रामराववाडी येथील ग्रामस्थांनीही प्रशासन दरबारी या रस्त्याची समस्या वेळोवेळी मांडून त्याचे काम करून वहिवाटीसाठी मोकळा करण्याची मागणी केली; परंतु अद्याप त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे किन्हीराजाचे सरपंच सुनिल घुगे यांच्यासह ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ३०० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करीत या रस्त्याचे काम त्वरीत करण्याची मागणी केली आहे.